Saturday, 30 December 2017

नैसर्गिक शेती पसरत का नाही ?

*खूप सारे लोक म्हणतात की नैसर्गिक शेती इतकी चांगली आहे तर मग ती गतीने पसरत का नाही ?*

1.गावरान गायींची कमतरता असल्यामुळे ही शेती पसरायला वेळ लागत आहे.पाळेकर गुरुजींच्या म्हणण्यानुसार सकाळी 5 वाजता उठून आपण डायरेक्ट गोमूत्र पकडून ही गरज पूर्ण करू शकतो.पण सकाळी उठून गोमूत्र पकडण्याची तयारी फार थोड्या शेतकऱ्यांची असते.व्यवस्थित गोठा करून नालीने गोमूत्र जमा करण्यासाठी 3 ते 4 गायी व बैलजोडी लागते.यावर पर्याय म्हणजे बरेचसे शेतकरी गोशाळेतून गोमूत्र आणतात व नैसर्गिक शेती करतात.
2.नैसर्गिक शेतीत पहिल्याच वर्षी उत्पन्न रासायनिक शेती इतकेच किंवा त्यापेक्षा जास्त येते,असे असले तरी सर्वच शेतकरी मजूर,रोपे,बियाणे,वेळ,गोमूत्र  उपलब्ध नसल्यामुळे आंतरपीक,आच्छादन, वापसा,सहजीवन, जीवामृत,घनजीवामृत,योग्य बिवड यासारख्या गोष्टींमध्ये कमी पडतात.परिणामी पहिल्या वर्षी उत्पादन 20 ते 30 ℅ घटू शकते.
3.ग्राहक नैसर्गिक शेतमालाला दुप्पट किंमत देत असले तरी सर्वच ग्राहक गावरान, विषमुक्त,चवदार,पौष्टिक या गोष्टींना महत्त्व देत नाहीत.बरेच ग्राहक व सर्वच व्यापारी आकार,रंग,आकर्षकपणा पाहून शेतमाल खरेदी करतात.अशी व्यवस्थाच तयार करण्यात आली आहे.नैसर्गिक शेतमाल निर्यात करतानाही या अडचणी येतात.
4.सरकार सेंद्रिय शेतीसाठी बियाणे, औषधे, गांडूळ खत,कंपोस्ट खत यासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान व प्रोत्साहन देत आहे.यासाठी प्रत्येक शहरात ATMA अंतर्गत प्रशिक्षण, मार्गदर्शन,जनजागृती कार्यक्रम सुरू आहेत.ब्रँडिंग, मार्केटिंग, प्रमाणीकरण यासाठी करोडो रुपये खर्च केले जात आहेत.तरीही सेंद्रीय शेती पछाडून भरारी हीच एक गोष्ट नैसर्गिक शेतीची ताकद दर्शवते.आणि रासायनिक शेतीसाठी तर हजारो करोड रुपये खर्च होतच आहेत.
5.अपुरी प्रचार प्रसाराची साधने हे नैसर्गिक शेती न पसरण्याचे महत्त्वाचे कारण आहे.सरकार,कृषी विद्यापीठे, कंपन्या,मीडिया यांना नैसर्गिक शेतीच्या प्रचारातून काहीही फायदा दिसत नाही.त्यामुळे देशभरात 50 लाख शेतकऱ्यांनी ही कृषी पद्धती स्वीकारली असतानाही अजूनही या कृषी पद्धतीवर सार्वजनिक स्वरूपात मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत नाही.या शेती पद्धतीला पसरवण्याचे काम पूर्णतः मोठ्या स्वरूपात पाळेकर गुरुजींच्या शिबिरातून होते.कुठल्याही प्रकारची जाहिरात न देता गुरुजींच्या शिबिरांना हजारो शेतकरी उपस्थित रहातात. देशाच्या कानाकोपऱ्यात असलेले नैसर्गिक शेती करणारे शेतकरी हळूहळू शेती पद्धती पसरवत आहेत.कित्येक सुशिक्षित,पर्यावरण प्रेमी,आरोग्या विषयी जागरूक लोक,साधूसंत,शेतकरी संघटन,समाजवादी,NGO व राजकीय लोकही आता या शेती पद्धतीचे महत्त्व समजून नैसर्गिक शेतीच्या प्रचाराचे काम करत आहेत.

तर मित्रांनो येत्या काळात नैसर्गिक शेती शिवाय पर्याय नाही.तेंव्हा काळाची व परिस्थितीची गरज लक्षात घेऊन आजच नैसर्गिक शेतीचे प्रयोग सुरू करा .
#चलानैसर्गिकशेतीकडे

No comments: