शेतकरी मित्रांनो ,
सध्या शेतकऱ्यांसमोर असणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे पिकांवर पडणारे रोग,कीड आहे.सध्याच्या रासायनिक शेती पद्धतीमुळे दिवसेंदिवस पिकांमधील प्रतिकार क्षमता कमी होत आहे.आपल्या जमिनीची सुपीकता कमी होत आहे.आज शेतकरी कीड व रोगांसाठी वातावरणाला जबाबदार धरतो.पण याचे मूळ दुसऱ्याच गोष्टींमध्ये सामावलेले आहे.कीड व रोग येण्याची कारणे ------
1.बियाणे----
सर्वात महत्त्वाचे कीड व रोग येण्याचे कारण म्हणजे संकरित बियाणे आहे. संकरित बियाण्यांची निर्मिती शेतकऱ्यांच्या हितासाठी नाही तर उद्योगांच्या हितासाठी करण्यात आली आहे.गावरान बियाणे हे स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेणारे असते. गावरान बियाणे वादळ, कमी जास्त पाऊस ,कडक ऊन, थंडी अशा सर्वच वातावरणात टिकाव धरून राहते.
2. रासायनिक खते---
रासायनिक खतांमुळे जमिनीची सुपीकता दिवसेंदिवस कमी होत जाते. जमिनीची सुपीकता कमी झाल्यामुळे पिकांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता कमी होत जाते यामुळे पिकावर मोठ्या प्रमाणात कीड येते.
3.कीटक नाशक --- मित्रांनो आपल्या शेतात निसर्गाची एक अद्भुत संरक्षक यंत्रणा आहे म्हणजे आपल्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी निसर्गाने योजना तयार केली आहे. आपण अशी योजना जंगलामध्ये पाहू शकतो. जंगलात झाडे निरोगी व फळाफुलांनी बहरलेली दिसतात. तिथे तर कोणीही रासायनिक कीटकनाशकांची फवारणी केली नाही.मग तेथील फळांवर रोग का आढळत नाही. याला कारण आहे तेथील मित्र कीटक, निसर्गात 80% कीटक हे मांसाहारी आहेत म्हणजे ते शाकाहारी कीटकांना खातात. म्हणजे आपल्या पिकाला फक्त निसर्गातील 20% कीटक हानी पोहोचवतात व उरलेले 80% कीटक या शाकाहारी कीटकांना खातात.विशेष म्हणजे मांसाहारी कीटकांचे प्रमाण निसर्गात खूप जास्त आहे. आपण जेव्हा रासायनिक कीटकनाशक फवारतो तेव्हा मोठ्या प्रमाणावर मित्र कीटक मारले जातात आणि निसर्गात असमतोल निर्माण होतो.यामुळे मोठ्या प्रमाणात शाकाहारी कीटकांची वाढ होते म्हणजे रासायनिक कीटकनाशकांमुळेच शेतांमधील किडींची संख्या वाढते.
4.पाणी ----
रासायनिक शेतीत पिकाला मुळी जवळ भरपूर पाणी दिले जाते त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोग येतात .
5.अंतर ---
अधिक उत्पन्न काढण्याच्या लालसेने व तणावर नियंत्रण मिळवण्यासाठी रासायनिक शेतीत कमीत कमी जागेत जास्त झाडे लावली जातात यामुळे झाडाची वाढ व विकास व्यवस्थित होत नाही.झाडांना आवश्यक पोषक तत्त्व,सूर्यप्रकाश मिळत नाही.याउलट नैसर्गिक शेतीत रासायनिक शेतीपेक्षा दुप्पट ते तिप्पट अंतर जास्त ठेवले जाते व आतल्या जागेत आंतरपिके घेतली जातात.यामुळे पिकांना आवश्यक सूर्यप्रकाश,हवा,पाणी ,पोषकतत्त्व अगदी पुरेपूर मिळतात. अशी झाडे कुठल्याही परिस्थितीत निरोगी व मजबूतपणे टिकून रहातात.
6.एकपिक पद्धती ---
निसर्गात बरीचशी सापळा पिके कीटकांपासून झाडाचे रक्षण करतात.वेगवेगळ्या झाडांवर वेगवेगळे कीटक बसत असतात.आंतरपिकांमुळे काही ठराविक प्रकारचे कीटक आपण पिकावर येण्यापासून वाचवू शकतो.
चिंतामुक्त,आत्महत्या मुक्त ,निरोगी जीवनाचा पर्याय म्हणजे झिरो बजेट नैसर्गिक शेती हाच आहे .
No comments:
Post a Comment